Sunday, 11 February 2007

अंधारयात्रा

अंधारयात्रा
सायंकाळचे रंग गडद होत चालले अ।हेत.चहूकडे अंधाराचे साम्राज्य नं।दण्यास सुरुवात झाली आहे.सूर्यास्ताने अंधःकाराच्या आगमनाचे बिगूल वाजवले आहे.आता ही रात्र पसरत जाणार....सर्वांना आपल्या कराल जबड्यात घेत...ज्यात ऍकदा शिरल्यावर परतण्याची सुतराम शक्यता नाही. चतुर कोल्ह्याच्या गोष्टीतील वृद्ध सिंहाच्या गुहेसारखे हे काळोखाचे कृष्णविवर आहे.यात फक्त आत जाणारी पावलेच दिसतात . बाहेर पडणारे मात्र ऍकही नाही.हे चित्रही आता हळूहळू धूसर होत जाणार. प्रकाशाचा धुरळा खाली बसून अंधाराचा ऍकछत्री अंमल राज्य करू लागणार.....
हे सगळे अशुभ,अमंगलाच द्योतक आहे..

रात्र ही निराशेच्या उदात्तीकरणासाठीच तर निसर्गाने निर्माण केली नाही ना ? भय हा तिचा स्थायीभाव अ।हे.असुरक्षितता हे तिचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ती कृष्णकृत्यांची जननी आहे.या रात्रीचा फायदा घेऊन न जाणो किती चोर ,लुटारू ,दरोडेखोरांनी आपले उदरनिर्वाह चालवले.किती मांत्रिकांनी अघोरी कर्मकांडे केली,किती राज्यकर्त्यांनी आपल्या शत्रूशी दगाफटका केला .
म्हणूनच की काय माझ्या पांढ़रपेशा मनाला असली अभद्र रात्र आवडत नाही अन् तिची नांदी देणारी सायंकाळही !

पण त्याला माझा इलाज नाही.काळोख हाच सर्व सृष्टीत ब्रह्मांडात भरून राहिला आहे.शिक्षकांनी
पांढ़य्रा फळ्यावर काढ़लेला काळा ठिपकाच विद्यार्थ्यांना दिसतो, यात त्यांची काहीच चूक नाही..

माझे म्हणणे कदाचित तुम्हाला पटत नसेल तर जरा ऍक मिनीट डोळे बंद करा......काय दिसतंय ,काहीच नाही ना,पण तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्हाला काळोख दिसतोय पण तो काळोख आहे हे मानायला आपण तयार होत नाही. आपल्याला जी गोष्ट पटत नाही ती अस्तित्वातच नाही असं सरळ सांगून आपण मोकळं होतो,किती पोकळ पळवाट आहे ना ही ?
तुम्हाला माझे मत भावनिक वाटत असेल कदाचित तर ऍखाद्या अंतराळवीराला विचारा की अवकाशात गेल्यावर सर्वप्रथम त्याला काय दिसले..तो निश्चितच सांगेन...काळोख !

तुमच्या माझ्यासारख्या कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम दिव्यांच्या झगमगाटात वावरणारया शहरी बुजगावण्यांना रा्त्रीच्या काळ्याकभिन्न आकाशाकडे नजर रोखून बघण्याची हिंमत नसते. चुकूनमाकून कधी टेलेस्कोपच्या माध्यमातून आकाशाकडे डोळे रोखलेच तर दूर कोठेतरी लकाकणारया खगोलीय वस्तूंना जवळ आणण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे काळोखापासून पळ काढ़ण्याचा ऍक केविलवाणा प्रयास !


पण हे सगळे प्रयत्न अंतिमतः अयशस्वीच ठरतात. काळोखापासून आपली कधीच सुटका होत नाही. तोच तिन्ही त्रिकाळ आपल्या सोबतीला असतो...
गर्भावस्थेपासून ते शेवटी मातीत मिसळून जाईस्तोवर..प्रत्येक क्षणाच्या कोनाड्यात तो उभा असतो..कुठे नसतो तो? पहाटेला काकडयासाठी देवळात जायच्या वाटेवर ,पडद्यावर प्रकाशाच्या खेळामुळे दिसणारया चित्रपटाच्या चित्रपटगृहात,ऍखादया जुन्या वाड्याच्या विषम पायरया असलेल्या अरूंद जिन्यात,पाठीला पाठ लावून उभ्या असलेल्या इमारतींच्या मध्ये असणारया चिंचोळया बोळीत,रोजच्याच वापरातल्या ऍखाद्या खोल विहीरीत, वाळवीने पोखरून टाकलेल्या ऍखाद्या लाकडी फळकूटात, दोन तीरांना जोडणारया जुन्या पडक्या दगडी पुलाखाली, नळासारख्या असंख्य नसाधमन्यांनी भरलेल्या आपल्या शरीरात,कित्येक फूट उंच वृक्षांनी भरलेल्या विषुववृत्तीय जंगलात , विचीत्र जीवांचे वास्तव्य असलेल्या महासागराच्या तळाशी, जमिनीखाली मैलोगणती पसरलेल्या खाणी अन् बोगद्यांमध्ये आणि अडगळीच्या अंधारया खोलीप्रमाणे अनेक निरूपयोगी विचार भावनांनी भरलेल्या आपल्या मनात...."प्रत्येक" ठिकाणी
तो आहे.

ऍखाद्या पूर आलेल्या प्रचंड नदीच्या पात्रात असणारया भोवरयात अडकल्यागत आपली अवस्था हा अंधार करून टाकतो, मग नुसते हातपाय झाडण्याचचं आपल्या हाती राहते.पण कोळ्याच्या जाळयात अडकलेला ऍखादा कीटक जसा स्वत़ःच्या सुटकेसाठी प्रयत्न करताना अधिकच गुरफटत जातो. तसे आपण अंधारडोहात जन्मभर खोल खोल फसत जातो.

जेथे प्रत्यक्ष मनःचक्षूंसमोरही अंधारी येते अशा गर्तेत आपला मेंदू फक्त ऍक् गोष्ट बघू शकतो, ती म्हणजे वाट ! प्रकाशाची वाट ! पण आपल्या सर्वोच्च वेगाचा अभिमान असलेला उर्मट ,नादान प्रकाश काळोखअचा व्यूह भेदू
शकतो ?
नाही ! सरळ रेषेत धावणारया प्रकाशाने सर्वव्यापी अंधाराला दिलेले आव्हान नेहमीच अल्पजीवी असते.स्वतःच्या तथाकथित पावित्र्याचा,तेजाचा,ग्यानाचा टेंभा मिरवणारा प्रकाशही आपल्या सारखाच या अंधारयात्रेत अस्तित्व गमावून बसतो.

अंधःकार स्वयंभू आहे, प्रकाश नाही, तो फक्त अंधाराचा अभाव आहे, हे ऍव्हाना आपल्याला पटलेले असते.

तरीही आपण आपली यात्रा सुरू ठेवतो, "अंधारयात्रा" ! कधीही न संपलेली , कधीही न संपणारी, अंधारच संपण्याची वाट बघत !
वाट बघणं हाच या यात्रेने शिकवलेला सर्वात महत्त्वाचा धडा असतो ना !

अभिषेक अनिल वाघमारे
पुणे.