Saturday, 16 August 2014

सिंघम रिटर्न्स......एक छीद्रान्वेषी रिव्ह्यू

सिंघम रिटर्न्स......एक छीद्रान्वेषी रिव्ह्यू


आजकाल वर्तमानपत्रातील सिनेमाची  परीक्षणं म्हणजे परीक्षण कमी आणि जाहिरात जास्त अशी अवस्था आहे. मोजून ३००-४०० शब्दांचा लेख.त्यातही  निम्मे शब्द सिनेमाची कथा सांगण्यात जातात . उरलेल्यापैकी निम्मे श्रेयनामावली आणि पात्र परिचय देण्यात जातात अन शिल्लक राहिलेल्या जागेत अभिप्राय (९०% वेळा अनुकूलच). त्यामुळे  अशा परीक्षणाची अपेक्षा  असलेल्यांनी पुढला मजकूर वाचण्याचे कष्ट घेऊ नये, हा नम्र सल्ला. इथे छीद्रान्वेषी म्हणजे चांगल्या गोष्टीत छीद्रे पडली आहेत का हे पाहणारा असा अर्थ नसून प्रस्तुत रिव्ह्युवरने स्वत:च्या खिशाला छीद्र पाडून घेऊन, रितसर तिकिट काढून केलेल्या अन्वेषणातून आलेला रिव्ह्यू होय.

       तर सध्या हिंदी सिनेमात सीक्वेलची साथ आली आहे.  त्याच साथीला बळी पडलेला हा एक नवा सिंघम. तीन वर्षांपूर्वी आलेल्या सिंघममधील मनोरंजनाच्या स्टॅंडर्डच्या अपेक्षेने जर तुम्ही हा नवा सिंघम बघायला जाल तर निराशाच होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन आहे, इमोशन आहे, ड्रामा  आहे, कॉमेडी आहे ,सामाजिक संदेश आहे पण एकच गोष्ट नाही ती म्हणजे तगडी कथा-पटकथा. आणि भरपूर प्रमाणात आहे ते ढिसाळ दिग्दर्शन- संकलन आणि न संपणार्‍या बंदुकीतील गोळ्या. पण सिनेमा पाहताना, त्यातही मुख्य धारेतला हिंदी किंवा इंग्रजी सिनेमा बघताना, हे असंच का ?. असं कधी होतं का? असले मूर्खासारखे  प्रश्न विचारत नसतात, हे मला पक्कं ठाऊक असल्याने मी त्या वाटेला जात नाही.

       सीक्वेल या संकल्पनेचा खरा फायदा म्हणजे हिरोसकट अन्य महत्वाची कॅरेक्टर्स पहिल्याच आवृत्तीत एस्टाब्लिष झालेली असल्यामुळे पटकथाकाराला सीक्वेलमध्ये  नवी कथा विस्ताराने मांडायला , नवी पात्रं तयार करायला जादा समय, जादा फूटेज मिळतं. पण हे सगळं करण्याची संधी रोहित शेट्टी व टीमने  वाया घालवली आहे. त्यामुळे एक बरा सिनेमा बनता बनता राहून गेला असं वाटत राहतं.  सध्या चाललेलं राजकारण दाखवायचं की विविध साधू-बाबांचा वरचेवर उघड होणारा भ्रष्टाचार दाखवायचा की समाजातल्या अंधश्रद्धांवर भाष्य करायचं की  नव्या पिढीच्या  बेजबाबदार वागण्यावर  बोलायचं की  पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यातील परवडीवर बोलायचं, यातलं कुठल्याही एका गोष्टीवर फोकस न करता आल्याने सिनेमाचा वातड चिवडा झाला आहे. पण मध्येच एखादा  चांगला सीक्वेंस एखाद्या चांगल्या शेंगदाण्यासाखा किंवा खोबर्‍याचा तुकड्यासारखा  तोंडात येतो आणि १४२ मिनिटातली काही मिनिटे तरी सुसह्य होतात. एंट्रीलाच सिंघम उपदेश मोड मध्ये येतो आणि आपल्याला पुढे काय पहायला मिळणार याची जाणीव होते आणि ती खरीही ठरते. पहिल्या सीनपासूनच  सिनेमा प्रेडिक्टेबल होतो अन् त्यातली मजा कमी कमी होत जाते. तसेच मागच्या सिनेमातील हिरोईनचं काय झालं ते काही समजत नाही.

       पटकथा  ज्या तर्‍हेने मुक्तपणे भरकटली आहे ते पाहता असं वाटतं की हा सिनेमा लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आणण्याचा आधी निर्माता- दिग्दर्शकांचा विचार असावा. परंतु तसं न करता आल्यामुळे मग कथा थोडी अजून इकडे तिकडे फिरवून आणली आहे. या चित्रपटाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे मध्यंतरानंतर काय होणार हे आपल्याला माहीत असल्याने मध्यंतर होण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो !

       अमोल गुप्तेने स्टॅनले का डब्बा नंतर पुन्हा एकदा चांगला खलनायक साकारायचा प्रयत्न केला आहे. पण करीना कपूरचे पात्र - जे नंतर पटकथेची एक लायबिलिटी बनत जातं , त्या पात्राला जादा फूटेज  देण्याचा नादात खलानायकाच्याच पात्रावर संकलकाची कात्री चालली अशी मला दाट शंका आहे. बरं करीना कपूर-खानच्या पात्रात काही नावीन्य आहे म्हणावं तर तेही नाही. ती नेहमी प्रमाणे बडबडी आहे आणि बरीचशी खादाडी आहे. पण कॉमेडीयन ही संस्था  आता सिनेमातून  नामशेष झाल्यामुळे त्याची कमतरता भरून काढण्याचा तिने मनापासून प्रयत्न केला आहे हे मात्र सांगायला हवं. मागचा सिंघम यशस्वी होण्यात प्रकाश राजच्या जयकांत शिक्रेचाच मोठा वाटा होता हे ध्यानात आल्यामुळे यावेळेस खलनायकाच्याच पात्राची छाटणी केली आहे. इतकी की आता काही तासातच मला खलनायकाचं सिनेमातलं नाव विचारलं तर सांगता येणार नाही पण तीन वर्षांपूर्वीचा जयकांत शिक्रे मात्र तुम्हालाही आठवत असेल. हे कदाचित अजय देवग़ण स्वत:च  सहनिर्माता असल्यामुळे असू शकतं. यात काही नवं नाही,  प्राण सिनेमा खाऊन टाकतो म्हणून त्याचासोबत काम करायला नकार देणारे सुपरस्टारसुद्धा आपण पाहिले आहेत.

शरत सक्सेनासारखे कलाकारही या सिनेमात उगीचच  वाया गेले आहेत. आणि काहींना अकारण महत्त्व दिलं गेलं आहे.उदा. सीआयडीवाला दया, बरखा दत्तसारखी दिसणारी पत्रकार वगैरे. हा दया, मला वाटतं,नवा जगदीश राज होण्याच्या मार्गावर आहे. दयाला दरवाजा तोडायला संधी मिळावी म्हणून एक सीक्वेंस ऐन मोक्याचा वेळेला घुसडलेला आहे. असो.

       दुसरी एक महत्वाची जाणवणारी गोष्ट म्हणजे सिनेमाचं बजेट. जवळपास ७०% सिनेमा स्टुडिओतच चित्रित झालेला वाटतो. आउटडोअर सीक्वेंसही बरेचसे मुंबईतलेच आहेत. यावेळेस गाड्या, खलनायकासोबत फिरणारे गुंड वगैरे कमी दाखवले आहेत. दंगेधोपे दाखवताना तोडफोड जेवढ्या प्रमाणात दाखवायला पाहीजे तेवढी दाखवलेली नाहीत. त्यामुळे त्याचा हवा तसा प्रभाव  पडत नाही. यात  आमचा दोष नाही,भरपूर तोडफोड,नासधूस पाहायची सवय हिंदी सिनेमानेच आम्हाला लावली आहे. क्लायमॅक्सचे पोलिसांचे मॉब सीन अजून उठावदार करता आले असते,त्याऐवजी पाण्यात पडलेली अ‍ॅम्बुलन्स दाखवण्यातच सगळं सिनेमेटोग्राफिक कौशल्य पणाला लावण्यात आलंय. इथे बजेट आड आले हे स्पष्ट जाणवते.  रिलायंस ही कॉर्पोरेट कंपनी निर्माती असल्याचा हा परिणाम असावा. आजकाल कॉर्पोरेट कंपन्या सिनेनिर्मितीत आल्यापासून सिनेमा शेवटी शेवटी आवरता घेण्याचे, बजेटमुळे पटकथा प्रभावित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

       संगीत या गोष्टीला सिंघममध्ये फारसा वाव नव्हताच तरीही अजय –अतुलचा पत्ता कसा कट झाला हे कळायला काही मार्ग नाही. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या उत्तमच आहे.

       तात्पर्य: लवकरच टी.व्ही.वर वर्ल्ड टीव्ही प्रिमीअर  वर सिंघम रिटर्न्स पाहायला आमची काहीच हरकत नाही. आणि तोपर्यंत चित्रपटगृहात जाऊन दौलतजादा करायची तुमची इच्छाच असल्यास , आम्ही कोणाकोणाचे हात पकडणार हो ?   

ता.क.: बरं इतका सिनेमा मनोभावे, डोळा लागू न देता पाहिल्यानंतर शेवटी यो यो हनी सिंग आहेच. या यो यो  हनी सिंगचं काय करायचं, काही इलाज आहे का ? 

1 comment:

prasanna said...

छान REVIEW - भाषा शैली उत्कृष्ठ

Post a Comment